
पेटीएम, एचडीएफसी बँक, बजाज जनरल इन्शुरन्स, मारिकोसह नामांकित कंपन्यांमध्ये संधी; पात्र उमेदवारांना दरमहा ₹९,००० विद्यावेतन, रुजू झाल्यावर ₹६,००० अनुदान
जळगाव (प्रतिनिधी) :
केंद्र शासनाच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयामार्फत (Ministry of Corporate Affairs) राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील युवकांसाठी नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या एकूण २७ संधी उपलब्ध झाल्या आहेत. दहावी, डिप्लोमा आणि पदवीधर पात्र उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने केले आहे.
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी विविध कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. यासोबतच प्रतिमहा ₹९,००० विद्यावेतन देण्यात येणार असून, इंटर्नशिपसाठी रुजू झाल्यानंतर एकरकमी ₹६,००० चे अनुदान देखील मिळणार आहे. त्यामुळे तरुणांना आर्थिक सहाय्यासह उद्योगविश्वाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सध्या जळगाव जिल्ह्यात Paytm Payment Services Limited, Bajaj General Insurance Limited, HDFC Bank आणि Marico Limited या देशातील नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या जागा उपलब्ध आहेत. या संधींसाठी दहावी उत्तीर्ण, डिप्लोमा धारक तसेच पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
इच्छुक उमेदवारांनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव येथे संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर माहिती मिळवावी. तसेच शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी. एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट देऊनही मार्गदर्शन घेता येईल.




