जळगावताज्या बातम्या

इंधन साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाची कडक पावले

जळगाव (प्रतिनिधी): इंधनाची साठेबाजी, काळाबाजार आणि अनधिकृत विक्री रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध निर्बंध लागू केले आहेत. औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांनी किरकोळ पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी न करता घाऊक इंधन केंद्रांमधूनच इंधन घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नवीन नियमांनुसार कोणत्याही वाहनाला एका दिवसात २०० लिटरपेक्षा अधिक डिझेल विक्री करता येणार नाही. तसेच खरेदी केलेल्या इंधनाची पुनर्विक्री करण्यासही मनाई करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्या आणि पेट्रोल पंप चालकांनी या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून हे निर्बंध पुढील आदेशापर्यंत किंवा कमाल ९० दिवस लागू राहतील.

जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याने पेट्रोलियम उत्पादनांच्या उपलब्धतेवर ताण निर्माण झाला आहे. काही भागांत मोठ्या प्रमाणावर इंधन खरेदी करून साठेबाजी केल्याच्या तक्रारी समोर आल्याने केंद्र शासनाने ११ जून २०२६ रोजी विशेष आदेश जारी करून इंधन विक्रीवर तात्पुरते नियंत्रण आणले आहे. त्यानंतर राज्य शासनानेही १२ जून रोजी या आदेशाच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले.

यापूर्वीच राज्य शासनाने पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी, काळाबाजार, अनधिकृत इंधन भरणे, इंधनात भेसळ, गळती, अनधिकृत हस्तांतरण, जादा दर आकारणी आणि निकृष्ट दर्जाच्या इंधन पुरवठ्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले होते.

या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. इंधनाशी संबंधित गैरप्रकारांवर कठोर नजर ठेवून दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश शासनाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button