
जळगाव परिमंडलात पावणेचार लाख ग्राहकांना लाभ
जळगाव (प्रतिनिधी): आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळतोय; शिवाय वापरावरही नियंत्रण ठेवता येतेय. विशेष म्हणजे घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरावर महावितरण घसघशीत सवलतही देत आहे. जळगाव परिमंडलातील पावणेचार लाख घरगुती ग्राहकांना आतापर्यंत जवळपास साडेचार कोटी रुपयांची सवलत मिळाली आहे. ही सवलत मिळवण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर आवश्यक आहे. ते बसवण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
राज्यात सौरऊर्जेसारख्या नवीकरणीय ऊर्जेची उपलब्धता वाढली आहे. ही वीज स्वस्त मिळत असल्याने महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार दिवसाच्या वीजवापरासाठी सवलत लागू केली आहे. घरगुती ग्राहकांना 2025 च्या जुलै महिन्यापासून सवलत मिळत आहे. टाईम ऑफ डे प्रणालीनुसार वीज वापराच्या कालावधीनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिकनंतर घरगुती ग्राहकांना प्रथमच स्वस्त वीज दरासाठी टीओडी (टाईम ऑफ डे) प्रमाणे आकारणी सुरू करण्यात आली. जुलै 2025 ते मार्च 2026 पर्यंत 80 पैसे प्रतियुनिट सवलत मिळाली. यंदा ही सवलत 85 पैसे प्रतियुनिट असून, पुढील तीन आर्थिक वर्षात ती वाढत जाणार आहे.
जळगाव परिमंडलात 3 लाख 73 हजार 615 घरगुती ग्राहकांना जुलै-2025 ते मे-2026 या 11 महिन्यांच्या वीजबिलात 4 कोटी 42 लाख 22 हजार रुपयांची टीओडी सवलत मिळाली. जळगाव मंडलातील 2 लाख 39 हजार 614 ग्राहकांना 2 कोटी 61 लाख 88 हजार रुपये, धुळे मंडलातील 83 हजार 70 ग्राहकांना 1 कोटी 1 लाख 28 हजार रुपये तर नंदुरबार मंडलातील 50 हजार 931 ग्राहकांना 79 लाख 5 हजार रुपये सवलत मिळाली.
नव्या तंत्रज्ञानाच्या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होत असल्याने अचूक बिले मिळून घरातील विजेचा वापर दर तासाला संबंधित ग्राहकांना मोबाईलवर पाहता येण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याद्वारे ग्राहकांचे वीजवापरावरही थेट नियंत्रण राहणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वीजग्राहक घरातील प्रामुख्याने वॉशिंग मशीन, ओव्हन, गिझर, एअर कंडिशनर व इतर उपकरणांचा मोठा वापर करतात. त्यात टीओडी मीटरमुळे ग्राहकांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे. विशेष म्हणजे महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.
ग्राहकांना अचूक व वेळेत वीजबिल देण्यास उपयुक्त ठरणारे अत्याधुनिक टीओडी वीजमीटर प्री-पेड नसून, पोस्टपेड आहेत. पूर्वीप्रमाणेच वीजवापरानंतरच ग्राहकांना वीजबिले मिळणार आहेत. हे मीटर मोफत बसवण्यात येत असून, ग्राहकांना कुठलाही आर्थिक भुर्दंड बसणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. यात मानवी हस्तक्षेपाला अजिबात वाव नाही. दिवसा वीजवापराची सवलत मिळवण्यासाठी ग्राहकांनी टीओडी मीटर बसवण्यासाठी सहकार्य करावे तसेच अधिक विजेची गरज असणारी उपकरणे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत प्राधान्याने वापरून सवलतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.




