जळगावताज्या बातम्याशैक्षणिक

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा पुढाकार; स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात विशेष प्रशिक्षण शिबिर

रावेर (प्रतिनिधी) : जिल्हा पोलिस दलाच्या शालेय सुरक्षा कार्यक्रमांतर्गत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर येथे विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा जनजागृती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे व इतरांचे संरक्षण कसे करावे, स्वसंरक्षणाचे महत्त्व, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, वाहतूक नियमांचे पालन तसेच सामाजिक जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रावेर पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक संदीप पाटील व सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील मोरे यांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. शालेय सुरक्षा कार्यक्रमांतर्गत दीपक पाटील व भूषण चौधरी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपत्ती व्यवस्थापन, ‘आपदा मित्र’ व ‘पोलिस मित्र’ संकल्पना, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी, प्रथमोपचाराचे महत्त्व आणि आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाच्या मूलभूत तंत्रांची माहिती देण्यात आली. अनोळखी व्यक्तींशी वागताना घ्यावयाची काळजी, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी, महिलांवरील अत्याचार प्रतिबंध, मोबाईलचा सुरक्षित वापर तसेच शाळा व परिसरातील सुरक्षाविषयक बाबींवरही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता धैर्य, संयम व तत्परता दाखवून योग्य निर्णय घेण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पवार, मुख्याध्यापक राजू पवार, पर्यवेक्षिका निळे मॅडम, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button