
जळगाव (प्रतिनिधी) : शिक्षण, करिअर आणि भविष्यातील वाढता ताण विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत असल्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद आकडेवारीनुसार २०२४ मध्ये देशभरात १४,८५८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली असून, दररोज सरासरी ४० विद्यार्थ्यांचा मृत्यू होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१३ मध्ये विद्यार्थी आत्महत्यांची संख्या ८,४२३ इतकी होती. त्यात सातत्याने वाढ होत गेली आणि २०२३ मध्ये हा आकडा १३,०४४ वर पोहोचला. २०२४ मध्ये यात आणखी वाढ होऊन १४,८५८ प्रकरणे नोंदवली गेली. म्हणजेच दशकभरात जवळपास ६५ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येते.
राज्यानुसार पाहता महाराष्ट्रात सर्वाधिक १,९०२ विद्यार्थी आत्महत्या नोंदल्या गेल्या आहेत. त्यानंतर मध्यप्रदेशमध्ये १,४७४ आणि तामिळनाडूमध्ये १,३३७ प्रकरणे समोर आली. उत्तरप्रदेशमध्ये हा आकडा १,०६० इतका आहे.
तज्ज्ञांच्या मते परीक्षा, गुणांची स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा, करिअरचा दबाव, बेरोजगारीची चिंता आणि मानसिक तणाव ही प्रमुख कारणे आहेत. २०२२ मध्ये परीक्षा अपयशामुळे १,७०७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
आकडेवारीनुसार देशातील एकूण आत्महत्यांपैकी सुमारे ७ टक्के मृत्यू विद्यार्थी आत्महत्यांचे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे, समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करणे आणि कुटुंबीयांनी संवाद वाढवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.



