
रावेर (प्रतिनिधी): पाल येथून आलेल्या भरधाव कारने शुक्रवारी सायंकाळी रावेर शहरातील प्रमुख रस्त्यांवर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण केले. भरधाव वेगामुळे अनेक पादचारी आणि वाहनचालकांना अपघाताची भीती निर्माण झाली. अखेर कार पाताळगंगा नाल्यातील चिखलात अडकल्यानंतर संतप्त नागरिकांनी कारमधील दोन संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
माहितीनुसार, एमएच-१९ ईए-२८०३ क्रमांकाची कार पाल, रमजीपूर आणि रसलपूर मार्गे रावेरमध्ये दाखल झाली. वाहनाची ओळख लपविण्याच्या उद्देशाने क्रमांक प्लेटवरील काही अंकांवर काळी चिकटपट्टी लावल्याचे निदर्शनास आले.
कारने शहरातील नागझिरी चौक, स्वामी विवेकानंद चौक, पाराचा गणपती मंदिर परिसर, रथघर चौक, महात्मा गांधी चौक तसेच आठवडे बाजार मार्गावर भरधाव वेगाने प्रवास केला. या प्रकारामुळे अनेक नागरिकांनी प्रसंगावधान राखून संभाव्य अपघात टाळला.
कारचा पाठलाग सुरू असतानाच चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पाताळगंगा नाल्यातील चिखलात अडकले. त्यानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी कारमधील दोघांना बाहेर काढून मारहाण केली. माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले.
चिखलात अडकलेली कार ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढून पोलिस ठाण्यात नेण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास रावेर पोलिसांकडून सुरू आहे.



