
नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यातील पात्र फळबागधारक शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन; हवामान जोखमीपासून फळबागेला मिळणार संरक्षण
जळगाव (प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्गठित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन 2026-27 अंतर्गत मृग बहारातील अधिसूचित फळपिकांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यातील द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, लिंबू, पेरू, सीताफळ, चिकू, संत्रा व हळद तसेच इतर अधिसूचित फळपिकांची लागवड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनी या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
सध्याच्या बदलत्या हवामानामुळे कमी पाऊस, पावसातील खंड, अतिवृष्टी, जास्त तापमान, आर्द्रता यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा व उत्पादनातील जोखीम कमी व्हावी, यासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या योजनेअंतर्गत हवामान निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते.
योजनेत सहभागी होण्यासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे (DCS) मध्ये पिकांची नोंद, ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी, आधार संलग्न बँक खाते आणि उत्पादनक्षम फळबाग असणे आवश्यक आहे. तसेच फळबागेचे Geo Tagging करणे बंधनकारक आहे.
शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव बँक, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) अथवा अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे अंतिम मुदत दि. १४ जुलै २०२६ पुर्वी सादर करावा. जिल्हानिहाय फळपिक निहाय पिक विमा हप्ता रक्कम सोबतच्या तक्त्यानुसार आहेत त्याप्रमाणे विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरणा करावा. संबंधित फळपिकानुसार जोखीमस्तर वेगवेगळे असल्यामुळे अधिक माहीतीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय, सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी किंवा मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
“फळबाग उभारण्यासाठी अनेक वर्षांचे श्रम व मोठी गुंतवणूक लागते. बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या जोखमीपासून संरक्षण मिळविण्यासाठी प्रत्येक पात्र फळबागधारकाने मृग बहार फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित अर्ज सादर करावा.” असे आवाहन श्री. सुभाष काटकर विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी केले आहे.



