
भुसावळ (प्रतिनिधी): उन्हाळी सुट्ट्या आणि लग्नसमारंभांच्या हंगामामुळे भुसावळ बसस्थानक परिसरात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली आहे. या गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांकडून चोरीच्या घटनांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः महिलांच्या दागिन्यांना लक्ष्य केले जात असल्याची माहिती समोर येत आहे.
गेल्या काही दिवसांत बसमध्ये चढताना किंवा उतरताना होणाऱ्या गर्दी व गोंधळात मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. अलीकडेच एका महिलेसोबत अशीच घटना घडली. प्रसंगावधान राखल्यामुळे मोठे नुकसान टळले, मात्र काही दागिन्यांचा भाग चोरीस गेल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणात तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.
दरम्यान, शनिवारी घडलेल्या घटनेत दोन महिला लग्नासाठी प्रवास करत असताना त्यांच्या जवळील सुमारे ३५ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. घरात ठेवण्यापेक्षा सुरक्षिततेसाठी दागिने सोबत घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, चोरी नेमकी कुठे झाली याबाबत स्पष्टता नसल्याने तक्रार कोणत्या ठिकाणी करावी, याबाबत संभ्रम निर्माण झाला असून त्यामुळे गुन्हा नोंदविण्यास विलंब होत आहे.
चोरटे संघटित पद्धतीने काम करत असल्याचेही समोर येत आहे. गर्दीत एक जण लक्ष विचलित करतो, तर दुसरा व्यक्ती दागिने किंवा बॅग हिसकावतो आणि तिसरा लगेच पसार होतो. प्रवाशांची घाई, निष्काळजीपणा आणि उघड्यावर दागिने परिधान करण्याची सवय यामुळे अशा घटनांना वाव मिळत असल्याचे दिसते.
पोलीस प्रशासनाने बसस्थानक परिसरात गस्त वाढवली असून प्रवाशांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ माहिती द्यावी. चोरीची घटना घडल्यास कोणत्याही पोलीस ठाण्यात ‘झिरो एफआयआर’द्वारे तक्रार नोंदविता येते, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.




