पाल वनक्षेत्रात वन्यप्राणी गणना; रानडुक्कर सर्वाधिक, बिबट्यासह विविध प्रजातींची नोंद

रावेर (प्रतिनिधी) : वन विभागाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या वन्यप्राणी गणनेत विविध प्राण्यांची उपस्थिती नोंदविण्यात आली असून, यामध्ये रानडुक्करांची संख्या सर्वाधिक आढळली आहे. बिबट्या, ससा, नीलगाय, कोल्हा तसेच इतर लहान-मोठ्या प्राण्यांचेही निरीक्षण करण्यात आले.
ही गणना बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने रात्रीच्या वेळी करण्यात आली. विविध ठिकाणी पाणवठ्यांजवळ व जंगलातील मार्गांवर निरीक्षण ठेवून ही प्रक्रिया पार पडली. वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी व स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला.
या मोहिमेत सुमारे १५ ठिकाणी निरीक्षण करण्यात आले. त्यातून एकूण २५० पेक्षा अधिक वन्यजीवांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये रानडुक्करांची संख्या लक्षणीय असल्याचे समोर आले आहे.
वनक्षेत्रातील जैवविविधता टिकवण्यासाठी अशा गणनांना महत्त्व असून, यामुळे वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना आखण्यास मदत होते, असे वन विभागाने सांगितले.




