
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपक्रमातून आरोग्य सेवेला बळ
जळगाव (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांमधून वंचित राहिलेल्या गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मोठा आधार ठरत आहे. जळगाव जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात १,६१० रुग्णांना सुमारे १३ कोटी ३३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना, अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस करणे आणि तातडीने अर्ज निकाली काढण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे मदत वितरण अधिक जलद आणि पारदर्शक झाले आहे.
याशिवाय, विविध संस्था, धर्मादाय रुग्णालये आणि दाते यांच्या सहकार्याने सामंजस्य करार आणि क्राउड फंडिंगच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यामुळे अधिकाधिक रुग्णांना वेळेत उपचारासाठी मदत मिळत आहे.
या निधीतून सुमारे २० गंभीर आजारांसाठी सहाय्य दिले जाते. यामध्ये हृदय, किडनी, यकृत, कर्करोग, डायालिसिस, अपघातग्रस्त रुग्ण, नवजात बालकांचे आजार तसेच विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
बालकांच्या कर्करोग उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, BPCL फाउंडेशन आणि Tata Memorial Centre यांच्यात नुकताच करार करण्यात आला आहे. या करारामुळे CSR अंतर्गत विशेष निधी उपलब्ध होऊन गरजू मुलांना उपचार सुलभ होणार आहेत.
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरातील ४०,७७६ रुग्णांना ३३३ कोटी रुपयांहून अधिक मदत देण्यात आली आहे. त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील १,६१० रुग्णांना सुमारे १३.३३ कोटी रुपयांचे सहाय्य मिळाले आहे.
गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा.




