क्राईमजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

चाळीसगावात सरकारी नोकरीच्या नावाखाली ६ लाखांची फसवणूक; तरुणांची दिशाभूल करून आरोपी फरार

चाळीसगाव (प्रतिनिधी) : पोलीस खाते व वनविभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन तरुणांकडून प्रत्येकी २ लाख रुपये, असा एकूण ६ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत फिर्यादी घनशाम कैलास पाटील (वय ३०, रा. हिंगोणे खुर्द, ता. चाळीसगाव) हे मोबाईल शॉपीचा व्यवसाय करतात. संशयित आरोपी कुणाल भगवान डांगर (रा. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. टाकळी प्र.चा., ता. चाळीसगाव) याने घनशाम पाटील यांच्यासह दीपक गोपीचंद चव्हाण व हर्षल दिलीप चव्हाण यांना सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

दि. ७ जून २०२४ ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत आरोपीने चाळीसगाव शहरातील गणेश कॉम्प्लेक्समधील देवांश मोबाईल शॉपी तसेच बँक ऑफ इंडिया परिसरात भेटी घेऊन तिघांकडून प्रत्येकी २ लाख रुपये स्वीकारले. मात्र, पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने व आरोपीकडून सतत टाळाटाळ सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणांना आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर घनशाम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कुणाल डांगर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button