
निवडणूक मतदानासाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी रोहन घुगे
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकार मतदार संघ निवडणूक-२०२६ साठी दिनांक १८ जून २०२६ (गुरुवार) रोजी सकाळी ८.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली .
जिल्हाधिकारी श्री. घुगे म्हणाले, या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ६३० मतदार असून त्यामध्ये पुरुष ३१५ व महिला ३१५ मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी जिल्ह्यात एकूण ७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यात अमळनेर, फैजपूर, भुसावळ, जळगाव, एरंडोल, पाचोरा व चाळीसगाव येथील केंद्रांचा समावेश आहे.
मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने दिलेले मतदान ओळखपत्र किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेने दिलेले ओळखपत्र ग्राह्य राहणार आहे.
या निवडणुकीत गुलाबी रंगाची मतपत्रिका वापरण्यात येणार असून मतदारांनी उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम १ पासून अंकात नोंदवायचा आहे. पसंतीक्रम लिहिताना आयोगाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला जांभळ्या रंगाचा स्केचपेन वापरणे आवश्यक आहे. शब्दात पसंतीक्रम लिहिणे ग्राह्य धरले जाणार नाही.
मतदान प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक क्षेत्रीय अधिकारी याप्रमाणे सात मतदान केंद्रावर सात क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नियुक्त करण्यात आली असून त्याठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानासाठी लागणारे साहित्य पोलिस बंदोबस्तात संबंधित केंद्रांकडे रवाना करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मतदान केंद्रात मोबाईल फोन, डिजिटल, पॅन कॅमेरा नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपेट्या अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे तयार करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात येणार असून यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील. निवडणूक आचार संहितेचे पालन सर्वानी करावे. तसेच मतदारांनी मतदान करावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.



