जळगावताज्या बातम्या

जिल्हा बँकेला १३५.९८ कोटींचा निधी; २७ हजार ५१४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

जळगाव (प्रतिनिधी): राज्य शासनाकडून कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला असून, जळगाव जिल्हा बँकेला २७ हजार ५१४ शेतकऱ्यांसाठी १३५ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी शुक्रवारी प्राप्त झाला आहे. या निधीमुळे संबंधित शेतकऱ्यांचे जुने कर्ज माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आगामी हंगामासाठी त्यांना नव्याने कर्ज मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शासनाच्या पोर्टलवर जिल्ह्यातील ६३ हजार ५११ पात्र शेतकऱ्यांची माहिती यापूर्वीच अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २७ हजार ५१४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

जिल्हा बँकेला प्राप्त झालेला निधी संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांशी जोडण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, पुढील खरीप व रब्बी हंगामासाठी नवीन पीककर्ज घेण्याचा मार्गही सुकर होणार आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेला निधी मिळाल्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असली, तरी २०१९ पासून थकीत असलेल्या शेतकऱ्यांचाही कर्जमाफीच्या योजनेत समावेश करावा, अशी मागणी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आधीच मागणीचे पत्र देण्यात आले असून, या प्रश्नावर लवकरच पुन्हा मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button