जळगावआंदोलनताज्या बातम्या

ऑडिओ क्लिप प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी नागरिकांचे आंदोलन; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

रावेर (प्रतिनिधी): सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे रावेर तालुक्यात वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणातील संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विविध सामाजिक, राजकीय आणि महिला संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

मुक्ताईनगर येथे सर्वपक्षीय नागरिकांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. संबंधित व्यक्तींविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आणि आक्षेपार्ह वक्तव्यांना आळा घालावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

दरम्यान, रावेर येथेही महिला आणि नागरिकांनी एकत्र येत तहसील कार्यालयात निवेदन दिले. या प्रकरणामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याची भावना व्यक्त करत, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दिरंगाई न करता कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

मोर्चा आणि निवेदनादरम्यान मोठ्या संख्येने महिला, नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत प्रशासनाने निष्पक्षपणे चौकशी करून सत्य बाहेर आणावे आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका मांडली.

यावेळी प्रशासनाने आंदोलकांकडून निवेदन स्वीकारून संबंधित मागण्या शासनाकडे पाठविण्याचे तसेच प्रकरणाची कायदेशीर चौकशी सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात विविध स्तरांतून चर्चा सुरू असून, नागरिकांनी सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राखण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button