
जळगाव (प्रतिनिधी): प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) २०२४-२५ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४४ हजार कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात आतापर्यंत १ हजार कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जात आहे.
जिल्हा परिषदेच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ४४ हजार ५७१ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मंजूर झाला आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, घरकुलांची कामे वेगाने पूर्णत्वाकडे जात आहेत.
८ हजार कोटींचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी टप्प्याटप्प्याने आर्थिक सहाय्य दिले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत निधीच्या विविध हप्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर अनुदान वितरित करण्यात आले आहे.
- प्रथम हप्ता: ९७ हजार ५७० लाभार्थी – १८८ कोटी
- द्वितीय हप्ता: ५८ हजार २६३ लाभार्थी – ६९ कोटी
- तृतीय हप्ता: ६१ हजार ६७५ लाभार्थी – १५७ कोटी
- चतुर्थ हप्ता: ३३ हजार १२ लाभार्थी – ९६ कोटी
योजनेची सद्यस्थिती
- एकूण उद्दिष्ट: १,३३,८६२ घरकुले
- मंजूर घरकुले: १,३३,२०८
- पूर्ण झालेली घरकुले: ४३,९६५
- प्रगतिपथावरील कामे: ५८,५७१
- प्रलंबित प्रस्ताव: ७९६
जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे घरकुल योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे. लाभार्थ्यांना वेळेत अनुदान उपलब्ध करून देत घरबांधणीची कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांची कामेही लवकर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर नियमित आढावा घेतला जात असून, लाभार्थ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शनही दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू लागले आहे.




