‘कापूस उत्पादकता अभियान २०२६-२७’ अंतर्गत बायोचार युनिट व कॉटन श्रेडरसाठी अनुदान; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सुरू

जळगाव (प्रतिनिधी): कापूस पिकाच्या काढणीनंतर होणारे नुकसान कमी करून उत्पादनाला मूल्यवर्धन मिळावे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या उद्देशाने कृषी विभागाने ‘कापूस उत्पादकता अभियान सन २०२६-२७’ अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या घटकातून बायोचार युनिट आणि कॉटन श्रेडर खरेदीसाठी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
बायोचार युनिटच्या माध्यमातून जमिनीतील कार्बनचे प्रमाण वाढवून सुपीकता सुधारण्याबरोबरच कापूस पिकाच्या पऱ्हाट्यांचा प्रभावी वापर करून उत्पादकता वाढविण्याचा उद्देश आहे. या घटकासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) तसेच कृषी क्षेत्रातील सहकारी संस्था पात्र आहेत. या घटकासाठी प्रति युनिट ५० टक्के किंवा कमाल १० हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान दिले जाणार आहे.
कापूस उत्पादनातील यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी कॉटन श्रेडर या घटकाचाही समावेश करण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान (SMAM) योजनेच्या धर्तीवर केली जाणार आहे. या घटकासाठीही वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रातील सहकारी संस्था पात्र आहेत.
अनुदानामध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना यंत्राच्या किंमतीच्या ५० टक्के, कमाल ७५ हजार रुपये, तर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ४० टक्के, कमाल ६० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
दोन्ही घटकांसाठी लाभार्थी निवड महाडीबीटी पोर्टलवरील ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (FCFS) या तत्त्वावर केली जाणार आहे. हे अनुदान क्रेडिट-लिंक्ड बॅक-एंडेड सबसिडी स्वरूपाचे असल्याने लाभार्थ्यांनी बँकेकडून कर्ज घेणे आवश्यक आहे. तसेच, एकाच यंत्रासाठी इतर कोणत्याही शासकीय योजनेतून अनुदान घेतले असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही.
इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर तातडीने ऑनलाइन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.




