जळगावताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात ५८ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

कृषी विभागाची तपासणी; २६६ पैकी २३ परवाने निलंबित

जळगाव (प्रतिनिधी): जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये खत, बियाणे आणि कीटकनाशकांच्या विक्रीसंदर्भातील नियमांचे पालन होत आहे का, याची तपासणी करण्यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबविली. या मोहिमेत विविध प्रकारच्या अनियमितता आढळून आल्याने ५८ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून, २३ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरावरील पथकांनी कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. यामध्ये विक्री नोंदी, खत व बियाण्यांचा साठा, परवान्यांच्या अटींचे पालन, दरपत्रक, बिलांची उपलब्धता तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान काही केंद्रांमध्ये दैनंदिन विक्री नोंदी अपूर्ण असल्याचे, साठा नोंदवहीमध्ये तफावत आढळल्याचे तसेच परवान्याच्या अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संबंधित केंद्रांविरोधात नियमानुसार कारवाई करण्यात आली.

कारवाईचा तपशील

बाबनिलंबनरद्दताकीद
खत११०२२६
बियाणे०२०४००
कीटकनाशके०००३००
एकूण२३०९२६

तपासणीचा उद्देश

कृषी निविष्ठांचा दर्जा कायम ठेवणे, शेतकऱ्यांना अधिकृत दरात आणि गुणवत्तापूर्ण खत, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध करून देणे तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.

यापुढेही जिल्हाभर अशा तपासण्या नियमितपणे सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button