
जळगाव (प्रतिनिधी): राज्यात महावितरणतर्फे आतापर्यंत १ कोटी २० लाख स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे अचूक रीडिंग होते. राज्यात स्मार्ट मीटरचे प्रमाण वाढल्यानंतर ग्राहकांच्या वीजबिलाच्या तक्रारी खूप कमी झाल्या आहेत.
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर संबंधित ग्राहकाला मोबाईल ॲपद्वारे दर तासाला त्याचा वीज वापर मोबाईल फोनवर समजतो. त्यामुळे वीजबिलाबाबत पारदर्शकता राहते. स्मार्ट मीटरमुळे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ग्राहकाला त्याच्या वीजवापरावर व वीजबिलावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.
स्मार्ट मीटरच्या ॲपद्वारे ग्राहकाला त्या घरात अथवा कार्यालयात अर्थिंगची समस्या अथवा वीजगळती होत असल्यास समजते. त्या माहितीचाही ग्राहकाला लाभ होतो.
ग्राहकाने कोणत्या वेळेला किती वीज वापरली हे स्मार्ट मीटरमुळे समजते. त्या आधारे घरगुती वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेसाठी प्रती युनिट ८५ पैसे सवलत मिळते. याशिवाय मोबाईल ॲपद्वारे बिल भरल्यास डिजिटल पेमेंटची सवलत आणि गो ग्रीनची दरमहा दहा रुपये सवलत मिळते.




