जळगावताज्या बातम्या

रावेर शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग; मुख्य रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

रावेर शहरात “सिंघम राज”

गेल्या कित्येक वर्षांपासून रावेर शहरात कोणताही विकास होताना दिसत नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे अतिक्रमणधारकांकडून होत असलेले अतिक्रमण. दिवसागणिक या अतिक्रमणात वाढ होत असल्याने रावेर शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणांनी वेढले गेले आहेत. या अतिक्रमणाचा त्रास वर्षानुवर्षे शालेय विद्यार्थ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच सहन करावा लागत आहे.

मुख्य रस्ता, आंबेडकर चौक ते ग्रामीण रुग्णालय या मार्गावर रावेर शहरातील बहुतांश शाळा, दुकाने, दवाखाने, बँका व विविध व्यावसायिक आस्थापने आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अनेक वर्षांपासून तारेवरची कसरत करावी लागत होती. मात्र, या समस्येकडे आजपर्यंत कोणीही ठोसपणे लक्ष दिले नव्हते. “मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?” या म्हणीप्रमाणे पुढाकार घेण्यास कोणीही तयार नव्हते.

अशा परिस्थितीत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पुढाकार घेतला. रावेर शहरात रुजू झाल्यानंतर त्यांनी जवळपास सर्वच लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शहरासाठी चांगले काम करण्याची गरज पटवून दिली. तसेच, अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईत कोणीही हस्तक्षेप करू नये, असे सामोपचाराने स्पष्ट करत कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला.

त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी हिंदी चित्रपटातील दृश्याप्रमाणे धडक कारवाई करत रावेर शहरात “सिंघम राज” सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रावेरच्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे.

अतिक्रमणधारकांपैकी सुमारे दोन टक्के लोक स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुख्य रस्त्यावर टपऱ्या उभारून व्यवसाय करत होते. मात्र, त्यांच्या या अतिक्रमणामुळे रावेर शहरातील बहुतांश नागरिकांना त्याचा फटका बसत होता. अनेक अतिक्रमणधारकांना राजकीय पाठबळ असल्याने नगरपरिषदेला अनेक वर्षांपासून अतिक्रमण हटविणे शक्य होत नव्हते.

मात्र, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, तहसीलदार मॅडम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी गांगुर्डे, नगरपरिषदेचे कर्मचारी, पोलिसांचा मोठा ताफा, जेसीबी मशीन व ट्रॅक्टर यांच्या साहाय्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत अतिक्रमण हटवून तब्बल ९८ टक्के नागरिकांना मोकळा श्वास घेता येईल, असे वातावरण निर्माण करण्यात आले.

या कारवाईबद्दल सर्वसामान्य जनतेतून सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे, विशेषतः पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांचे कौतुक करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, फैजपूर येथील प्रांताधिकारी तसेच विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी ही अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वी करून दाखविली.

यामुळे शहरातील मुख्य रस्ते मोकळे होऊन स्वच्छ वातावरण निर्माण झाले असून, हे वातावरण किती दिवस कायम राहते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, अनेक सुज्ञ नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, राजकीय पदाधिकाऱ्यांनी अशा अनधिकृत अतिक्रमणांना पाठबळ देऊ नये, अशा चर्चांनाही शहरात उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button