
जळगाव (प्रतिनिधी) : अनुभूती निवासी स्कूलने आयसीएसई (दहावी) आणि आयएससी (बारावी) परीक्षेत यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेने सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकालाची नोंद करत शैक्षणिक गुणवत्तेचा मान उंचावला आहे.
जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात पलक सुराणा हिने ९६.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. स्वयंम पाडे याने ९५.६० टक्के गुणांसह द्वितीय तर स्तुती गर्ग हिने ९४.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. या परीक्षेला एकूण ३२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
बारावीच्या आयएससी परीक्षेत अलेफिया शाकीर कुझेमा हिने ९२.७५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. ट्विंकल ललवाणी हिने ९१.७५ टक्के गुणांसह द्वितीय तर आर्यमान बोथरा याने ८९.७५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. बारावीच्या परीक्षेला एकूण १७ विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी इंग्रजी, अकाउंट्स, कॉमर्स, इकॉनॉमिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि गणित या विषयांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध उपक्रम, स्पर्धा आणि अनुभवाधारित शिक्षण पद्धती राबविण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि नेतृत्वगुण विकसित होत असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
शाळेच्या स्थापनेपासून सातत्याने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखण्यात अनुभूती निवासी स्कूलला यश आले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शाळेचे अध्यक्ष अशोक जैन, संचालिका सौ. निशा अनिल जैन तसेच प्राचार्य देबासिस दास यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




