ताज्या बातम्याजळगाव

उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी प्रशासनाचे उपाययोजनांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी): भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार आगामी काही महिन्यांत तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अत्यंत उष्णतेमुळे बांधकाम क्षेत्रातील कामगार, वीटभट्टी कामगार, रोजंदारी मजूर तसेच असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना उष्माघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नियोक्ता, उद्योगसंस्था, बांधकाम कंपन्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने अमलात आणाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.

कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कामाचे वेळापत्रक बदलून दुपारच्या तीव्र उष्णतेत काम टाळणे, आवश्यक विश्रांती देणे आणि कामाचा ताण कमी ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय कामगारांसाठी पुरेसे पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था, थंडावा मिळेल अशी विश्रांतीस्थळे तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या समन्वयाने नियमित आरोग्य तपासणी करणेही महत्त्वाचे मानले जात आहे.

दरम्यान, उन्हाळ्यात होणाऱ्या ग्रामयात्रा, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती, प्राथमिक उपचार सुविधा, पुरेसे पिण्याचे पाणी व इलेक्ट्रोलाइट पेय उपलब्ध करणे आवश्यक आहे. तसेच कार्यक्रमांचे वेळापत्रक उष्णतेच्या तीव्रतेनुसार बदलण्याचा विचार करण्यासही सांगण्यात आले आहे.

उष्णतेच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी घोषणाबाजी, माहिती फलक व पत्रकांचा वापर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. सर्व संबंधित विभाग, उद्योग आणि स्थानिक संस्था यांनी समन्वयाने काम करून या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button