
जळगाव (प्रतिनिधी): जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त पुढाकारातून जिल्ह्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पार पडला असून, जिल्हाभरातील पोलिस पाटील मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यशाळेदरम्यान विविध शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांनी पोलिस पाटील यांच्या जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. फैजपूरचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी महसूल विभागातील भूमिका स्पष्ट केली, तर जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी पोलिस यंत्रणेशी संबंधित कर्तव्ये समजावून सांगितली.
तसेच, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविर रावळ यांनी आपत्ती व्यवस्थापनात पोलिस पाटील यांचे महत्त्व अधोरेखित केले. निवडणूक उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेत त्यांच्या सहभागाची माहिती दिली. याशिवाय, सहायक महसूल अधिकारी अतुल जोशी यांनी सध्या सुरू असलेल्या जनगणना उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेमुळे पोलिस पाटील यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून प्रशासन आणि पोलिस विभागामधील समन्वय अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.




