
जळगाव (प्रतिनिधी): रोहन घुगे यांनी नवी मुंबईतील खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी होणाऱ्या ‘हिंद-दी-चादर श्रीगुरु तेग बहादूर साहिब जी यांचा 350 वा शहिदी समागम’ या भव्य देशव्यापी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून जाणाऱ्या भाविकांच्या नियोजनाचा आढावा घेतला.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासन, सेवाभावी संस्था व सामाजिक संघटनांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, या कार्यक्रमाचा जिल्ह्यात विविध माध्यमांतून व्यापक प्रचार सुरू असून जास्तीत-जास्त भाविकांनी सहभाग नोंदवावा. तसेच तालुकास्तरावरून भाविकांच्या जाण्या-येण्याकरिता सामाजिक संघटनांच्या मदतीने बसेसची व्यवस्था करण्यात पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सूचित केले.
कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी जिल्हा प्रशासनामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असून जळगाव शहरासह तालुकास्तरावर चित्ररथ व हार्डिंगद्वारे जनजागृती सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
देश व राज्यातील अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून सर्व समाजघटक, युवक-युवती व सेवाभावी संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास हा उपक्रम यशस्वी ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी, महापालिका अधिकारी, तसेच शीख, शिकलगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहियाल, वाल्मिकी उदासीन व भगत नामदेव वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.




