ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषीचा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

महा पशुधन एक्स्पो 2026 चे परळीत उद्घाटन; 38 एकर क्षेत्रात भव्य मांडणी
बीड (प्रतिनिधी): ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात उद्योजक घडावेत यासाठी राज्य शासनाने पशुपालनाला कृषीचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कृषीच्या दराने कर्जपुरवठा तसेच पशुपालनासाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार असून, या क्षेत्रात ग्रामीण उद्योजकतेला चालना मिळेल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
परळी येथील अंबाजोगाई मार्गालगत असलेल्या ओपळे मैदानावर आयोजित महा पशुधन एक्स्पो 2026 च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. हे भव्य पशुपक्षी प्रदर्शन 38 एकर क्षेत्रात भरविण्यात आले असून, ते 15 फेब्रुवारीपर्यंत तीन दिवस चालणार आहे.
यावेळी आमदार धनंजय मुंडे, पशुसंवर्धन सचिव डॉ. एन. रामास्वामी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पशुसंवर्धन आयुक्त प्रविण देवरे तसेच नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गोपूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तसेच दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यात आले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, पशुपालन हा केवळ व्यवसाय न राहता उद्योगात रूपांतरित व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामतीसोबत परळी येथे पशु महाविद्यालय मंजूर करून घेण्यात आले.
या प्रदर्शनात देशातील विविध भागांतील पशुधन पाहण्यासाठी उपलब्ध असून, देशातील सर्वात लहान गाय, विविध प्रजातींच्या गायी, बैल, घोडे, बकरे तसेच अनेक पक्ष्यांचा समावेश आहे. पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादकता वाढवणारी साधने व पशूंवरील उपचारासाठीची औषधेही येथे उपलब्ध आहेत. यासोबतच तज्ज्ञांचे मार्गदर्शक व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी महा पशुधन एक्स्पो 2026 ची पाहणी करणार असल्याची माहितीही पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.



