
जळगाव (प्रतिनिधी): राज्यातील वीजग्राहकांसाठी दिलासादायक ठरणारी बातमी असून महावितरणकडून स्मार्ट टीओडी (टाईम ऑफ डे) वीजमीटर बसवण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. 9 ते 23 फेब्रुवारीदरम्यान ‘स्मार्ट मीटर पंधरवडा’ साजरा करण्यात येत असून, या उपक्रमातून ग्राहकांना अचूक बिलिंग, पारदर्शकता आणि वीजदरात सवलतीचा थेट लाभ मिळणार आहे.
महावितरण ही राज्यातील सुमारे 3 कोटी 16 लाख वीजग्राहकांना वीजपुरवठा करणारी शासकीय कंपनी आहे. ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी यापूर्वी फोटो मीटर रीडिंग, मोबाईल अँपद्वारा रीडिंग, केंद्रीकृत बिलिंग प्रणाली यांसारखे उपक्रम राबवण्यात आले आहेत. त्याच दिशेने पुढचे पाऊल म्हणून स्मार्ट टीओडी मीटर बसवण्यात येत आहेत.
स्मार्ट मीटरचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्वयंचलित व अचूक मीटर रीडिंग. यामुळे मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या चुका, अंदाजे बिले किंवा रीडिंग न मिळाल्यामुळे निर्माण होणाऱ्या तक्रारी पूर्णतः टळणार आहेत. घर बंद असले किंवा कंपाउंड लॉक असला तरीही रीडिंग आपोआप घेतले जाणार असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
टीओडी प्रणालीमुळे वीजदरातही सवलत मिळणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत वापरल्या जाणाऱ्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत देण्यास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. ही सवलत 1 जुलै 2025 पासून लागू असून, त्यामुळे घरगुती ग्राहकांचे वीजबिल कमी होण्यास मदत होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे स्मार्ट टीओडी मीटर महावितरणकडून शंभर टक्के मोफत बसवण्यात येत आहेत. ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच हे मीटर पोस्टपेड स्वरूपाचे असून, सध्याची मासिक बिलिंग प्रणाली कायम राहणार आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजदर वाढतील, हा गैरसमज असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सौर ऊर्जेच्या वापराच्या दृष्टीनेही स्मार्ट मीटर उपयुक्त ठरणार आहेत. नेटमीटर प्रणालीमुळे छतावरील सौर प्रकल्पातून निर्माण होणारी, वापरली जाणारी तसेच ग्रीडला दिली जाणारी वीज याचा अचूक हिशेब ठेवता येणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौर प्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर विशेष फायदेशीर ठरणार आहेत.
एकूणच, स्मार्ट टीओडी मीटरमुळे अचूक बिलिंग, पारदर्शकता आणि वीजदरातील सवलतीचा लाभ ग्राहकांना मिळणार असून, महावितरणने ग्राहकांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
— ज्ञानेश्वर आर्दड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण



