कासोदा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस भरती पूर्व सराव परीक्षेचे यशस्वी आयोजन

१२५ परीक्षार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून आणि कासोदा पोलीस स्टेशन तसेच पोलीस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज, रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ‘पोलीस भरती पूर्व सराव लेखी परीक्षेचे’ आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला कासोदा परिसरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून एकूण १२५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस प्रशासनातर्फे परीक्षार्थींना काळा पेन, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था देखील करण्यात आली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
हा उपक्रम जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (चाळीसगाव भाग) विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.
यशस्वीतेसाठी कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, सर्व पोलीस अंमलदार आणि कासोदा पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल परीक्षार्थींनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले असून, भविष्यातही अशाच प्रकारचे मार्गदर्शक उपक्रम राबविण्याची विनंती केली आहे. या उपक्रमामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या स्थानिक तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.




