
ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागातर्फे दर्पणदिन साजरा, मराठी संकेतस्थळ व ‘मूल्यगुंजन’ मीडियासंवाद मालिकेचा शुभारंभ
जळगाव (प्रतिनिधी) : ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभागातर्फे पत्रकार दिन अर्थात दर्पणदिन ब्रह्माकुमारीज् ढाके कॉलनी, जळगाव सेवाकेंद्रात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महाराष्ट्र राज्यासाठी मराठी भाषेत मीडिया संदर्भातील माहिती उपलब्ध करून देणाऱ्या संकेतस्थळाचा तसेच मूल्याधिष्ठित पत्रकारितेला प्रोत्साहन देणाऱ्या संवाद मालिकेचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. सोमनाथ वडनेरे, राज्य समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांनी केली. त्यांनी माऊंट आबू येथे आयोजित करण्यात आलेल्या मीडिया संमेलनाची माहिती देताना मूल्यनिष्ठ पत्रकारितेवर विविध अंगांनी व्याख्याने व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजप्रबोधनासाठी केलेल्या कार्याचा सविस्तर आढावाही त्यांनी घेतला.
कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉ. रविंद्र ठाकूर, जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव होते. आपल्या संबोधनात त्यांनी बाळशास्त्री जांभेकरांनी रुजविलेल्या मूल्यनिष्ठ पत्रकारितेचा वारसा पुढे नेण्यासाठी ब्रह्माकुमारीज् मीडिया प्रभाग, माऊंट आबू यांचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगितले. जळगाव मीडियासेवाकेंद्रामार्फत राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे पत्रकारिता व माध्यम क्षेत्रात सकारात्मक मूल्यांची जपणूक होत असल्याचे त्यांनी नमूद केले. पेन पत्रकारितेपासून पेनलेस पत्रकारितेपर्यंतच्या प्रवासात तंत्रज्ञानाचा वापर वाढला असला तरी मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी पत्रकार, माध्यमसंस्था व समाज यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
मराठी संकेतस्थळ व ‘मूल्यगुंजन’ मीडियासंवाद मालिकेचा शुभारंभ
या प्रसंगी मुख्य उपक्रमांचे उद्घाटन डॉ. रविंद्र ठाकूर, डॉ. सोमनाथ वडनेरे, ब्र.कु. मिनाक्षीदीदी आणि ब्र.कु. मधुकर सोनार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
पहिल्या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी मराठी भाषेत ब्रह्माकुमारीज् मीडिया संदर्भातील लेख, बातम्या व उपक्रमांची माहिती उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘बीकेमहामीडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
दुसऱ्या उपक्रमांतर्गत ‘मूल्यगुंजन’ या मीडियासंवाद कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात मीडिया व पत्रकारितेत मूल्यांचे संवर्धन या विषयावर डॉ. सोमनाथ वडनेरे यांच्याशी सुप्रसिद्ध सूत्रसंचालिका अनिता करवा संवाद साधणार आहेत.
कार्यक्रमास आशीर्वचन देताना ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदीजी, क्षेत्रीय निर्देशिका, ब्रह्माकुमारीज् जळगाव यांनी नवयुगाची चाहूल जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी माध्यमांनी मूल्याधिष्ठित भूमिका निभावावी, असे आवाहन त्यांनी केले व माध्यम प्रतिनिधींना त्यांच्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रकटन ब्र.कु. मधुकर सोनार यांनी केले. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार व सहकाऱ्यांचे आभार मानत पत्रकारितेतील बदलते प्रवाह, तंत्रज्ञानाचा प्रभाव आणि मूल्यांचे महत्त्व यांचा थोडक्यात आढावा घेतला.




