
जळगाव (प्रतिनिधी) : रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या ज्ञान संकल्प या कॉन्फरन्सचा जैन हिल्स मधील आकाश सभागृहात थाटात शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी दीपस्तंभ मनोबलचे संचालक यजुवेंद्र महाजन, प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, गव्हर्नर इलेक्ट डॉ. राजेश पाटील, सहप्रांतपाल डॉ. अपर्णा भट – कासार, डिस्ट्रिक्ट इंटरॅक्ट कमिटी चेअरमन मनोज जोशी या मान्यवरांसह अध्यक्ष गिरीश कुलकर्णी, मानद सचिव सुभाष अमळनेरकर, संवाद सचिव पंकज व्यवहारे, इंटरॅक्ट कमिटी चेअरमन डॉ. काजल फिरके यांची डॉ. किशन काबरा मंचावर (व्यासपीठावर) प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख वक्ते यजुवेंद्र महाजन यांनी दीपस्तंभ – मनोबल मधील दोन्ही हात नसलेली विद्यार्थिनी माऊली, दोन्ही पाय नसलेला अनाथ विद्यार्थी राज आणि अंध असलेली अंजली या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संघर्ष कथा व यशोगाथा सांगून विद्यार्थ्यांना निःस्वार्थपणे, सेवाभाव ठेवून इतरांना मदत करा. आयुष्यात चुकीचे काम न करता प्रामाणिकपणे चांगला माणूस बनण्याच्या प्रयत्न करा असे आवाहन केले.
प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांनी रोटरीतर्फे १२ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये सेवा, संस्काराच्या माध्यमातून नेतृत्व, संवाद व नियोजन कौशल्य विकसित करणारे इंटरॅक्ट व्यासपीठ आहे असे सांगून रोटरीची चतुसूत्री सांगितली. कार्यक्रमात ज्ञानप्रकाश या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मनोज जोशी यांनी तर सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले. परिचय ॲड. सागर चित्रे यांनी तर ॲड. हेमंत भंगाळे यांनी आभार मानले.
दीप प्रज्वलन व प्रभाकर संगीत कला अकादमीच्या विद्यार्थिनींनी कथक नृत्यद्वारे गणेश वंदना सादर केली. कार्यक्रमाच्या सुरवातीस श्रीराम विद्यालयाच्या लेझीम पथकाने या. दे. पाटील शाळेच्या महापुरुषांच्या वेषातील विद्यार्थ्यांसह सर्व मान्यवरांचे आगमन झाले. काॅन्फरन्सला ४२९ विद्यार्थी, ४५ शिक्षक व विविध क्लबचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.




