कल्याण येथे स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाचे उद्घाटन; महारक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

कल्याण (प्रतिनिधी): मुंबई येथील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था (AIILSG) यांच्या शताब्दी वर्षानिमित्त कल्याण विभागीय केंद्रात स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector) अभ्यासक्रमाच्या जून २०२६ नियमित व हॉलिडे बॅचच्या वर्गाचे उद्घाटन सोमवार, दि. २० जुलै २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकरे (घनकचरा व पर्यावरण विभाग) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
याच निमित्ताने संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २२ विद्यार्थी व नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव जपली. हा कार्यक्रम कल्याण (पूर्व) येथील महापालिका वॉर्ड क्र. ४-जे विभागीय कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर आयोजित करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक सेवेमध्ये स्वच्छता निरीक्षकांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा देताना समाजहिताच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमास स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, परिसरातील नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी कल्याण विभागीय संचालक मारुती खोडके, विनीत सर, गुप्ता मॅडम, अनिल जाधव, पाटील साहेब तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
महारक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण (पश्चिम) येथील अर्पण रक्तपेढीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.




