राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयात वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘बालतरू’ देऊन गौरव

पारोळा (प्रतिनिधी): राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय, पारोळा येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात पदवी परीक्षेत यश संपादन केलेल्या तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार पुष्पगुच्छाऐवजी देशी वृक्षांचे ‘बालतरू’ भेट देऊन करण्यात आला.
पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, प्रत्येक विद्यार्थ्याने भेट म्हणून मिळालेल्या वृक्षाचे रोप आपल्या घराजवळ किंवा शेतात लावून त्याचे संगोपन करावे, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा संदेश देत वृक्षसंवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष तथा संस्थेचे संचालक ॲड. रोहन मोरे, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन एल. पवार, वनपाल रविंद्र सी. सोनवणे, दिपक एन. पाटील, वनरक्षक दिपक जी. पाटील, दिनेश देवरे, भूषण पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. बी. भावसार, डॉ. जी. पी. बोरसे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप राठोड तसेच सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. आर. बी. पाटील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या गुणवंत कामगिरीचा गौरव करताना सामाजिक वनीकरण विभागामार्फत प्रत्येक विद्यार्थ्याला देशी वृक्षाचे रोप भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांनी ही रोपे लावून त्यांचे जतन व संवर्धन करावे, तसेच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन वनपाल रविंद्र सी. सोनवणे यांनी केले.
यावेळी उपनगराध्यक्ष तथा संस्थेचे संचालक ॲड. रोहन मोरे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, प्रत्येकाने वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र ओळ:
पदवी परीक्षेत यश मिळविलेल्या व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा देशी वृक्षाचे ‘बालतरू’ भेट देऊन गौरव करताना उपनगराध्यक्ष तथा संस्थेचे संचालक ॲड. रोहन मोरे, प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील व मान्यवर.




