ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी भाषा संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबविणार

राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता आणि सातत्यावर भर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जळगाव (प्रतिनिधी): मराठी भाषा, साहित्य, विविध बोलीभाषा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्यस्तरावर ठोस कृती आराखडा तयार करून त्याची नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी वर्षभरातील सर्व वैधानिक बैठकींचे वेळापत्रक आगाऊ निश्चित करण्यावर त्यांनी भर दिला.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाची बैठक पार पडली. बैठकीला मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संस्थेचे सदस्य प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

संस्थेच्या कामकाजाचे कौतुक

राज्य मराठी विकास संस्थेने प्रलंबित वैधानिक प्रक्रिया पूर्ण करून प्रशासकीय रचना अधिक सक्षम केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. आता संस्थेने मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन आणि संवर्धनासाठी दीर्घकालीन धोरणे राबविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नही सकारात्मक पद्धतीने सोडविण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बोलीभाषा आणि लोककलेच्या जतनावर भर

बैठकीत सदस्यांनी मराठीच्या विविध बोलीभाषा आणि लोकपरंपरा जतन करण्यासाठी अनेक सूचना मांडल्या. ‘पुस्तकांचे गाव’ आणि ‘पेटी वाचनालय’ यांसारख्या उपक्रमांचा ग्रामीण, आदिवासी आणि सीमावर्ती भागात विस्तार करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच झाडीबोली, लोकनाट्य, भारूड, गोंधळ, पोवाडा अशा लोककलांचे संवर्धन करण्यासाठी विशेष प्रकल्प राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

बालसाहित्य आणि ग्रंथालयांना चालना

बालसाहित्य निर्मितीला प्रोत्साहन देणे, शाळा आणि सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये दर्जेदार मराठी साहित्य उपलब्ध करून देणे, तसेच नव्या पिढीमध्ये वाचनसंस्कृती विकसित करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

डिजिटायझेशन आणि जागतिक मराठी केंद्राला गती

तंजावर येथील मोडी लिपीतील सुमारे १५ लाख ऐतिहासिक दस्तऐवजांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच लंडन येथे उभारण्यात येणाऱ्या जागतिक मराठी केंद्राच्या कामाला गती देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

जागतिक स्तरावर मराठीचा प्रसार

मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक ओळख मिळावी यासाठी विविध देशांमध्ये मराठी मंच उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. विविध भारतीय तसेच परदेशी भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र अनुवाद समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button