
१२ तास सतत अभ्यास उपक्रम उत्साहात
जळगाव (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त नुकतेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, जळगाव येथे ‘संविधान-शक्ती : १२ तास सतत अभ्यास’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. १३ एप्रिल रोजी सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत आयोजित या उपक्रमात ३८ विद्यार्थ्यांनी सलग १२ तास शांततेत अभ्यास करून महापुरुषांना अनोखी अभिवादन केली.
या उपक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच सम्राट अशोक यांच्या विचारांचाही जागर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. सुरुवातीच्या सत्रात संविधान वाचनानंतर विद्यार्थ्यांनी बीएएमएस अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित केले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी संपूर्ण कालावधीत मोबाईलचा वापर टाळून एकाग्रतेचा आदर्श घालून दिला.
उपक्रमाचे उद्घाटन अधिष्ठाता डॉ. संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुभाषचंद्र मडावी, डॉ. सचिन नरवाडे व डॉ. रेणुका देव्हारे यांच्या हस्ते झाले. “उत्सवापेक्षा विचारांची अंमलबजावणी महत्त्वाची आहे,” असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
दिवसभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘विश्वरत्न ग्रँड प्राईज’, ‘द पॉलिमॅथ अवॉर्ड’, ‘द कॉन्स्टिट्यूशन गार्ड’ व ‘द पर्सिस्टन्स अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार असून, शैक्षणिक क्षेत्रात या उपक्रमाची विशेष दखल घेतली जात आहे.




