
जळगाव(प्रतिनिधी): जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, २० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे.
जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, पीडित व समस्याग्रस्त महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक अधिकृत व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या तक्रारी, अडचणी आणि हक्कांशी संबंधित मुद्द्यांवर शासकीय यंत्रणेकडून थेट सुनावणी करून त्यांचे तत्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच महिलांना मार्गदर्शन व आवश्यक सहाय्य देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाते.
महिला लोकशाही दिन हा उपक्रम दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर नियमितपणे आयोजित केला जातो. त्यानुसार या महिन्यातील कार्यक्रम २० एप्रिल रोजी पार पडणार आहे.
याबाबतची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.




