
रावेर (प;प्रतिनिधी) : स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आजपासून चार दिवसांचा समर कॅम्प उत्साहात सुरू झाला असून विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या समर कॅम्पचे उद्घाटन शाळेच्या संचालिका डॉ. सुखदा पवार यांच्या हस्ते रिबीन कापून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्राचार्य रातिश मोन ए. व्ही. सर, अनिता पाटील मॅडम आणि शिरीष मैराळे सर उपस्थित होते.
या समर कॅम्पचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले “रावेर दर्शन”. यामध्ये घोडागाडीमधून विद्यार्थ्यांना स्वामी इंग्लिश मीडियम स्कूलपासून महात्मा गांधी चौक, दुर्गा देवी मंदिर, लंगडा मारुती मंदिर, पाराचा गणपती, महालक्ष्मी मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन तसेच स्टेशनवरील देवीचे दर्शन घडवून पुन्हा शाळेत आणले जाणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक पर्यटनाचा आनंद मिळणार आहे.
समर कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रिंग पासिंग, सुमो गेम, टेबल कप गेम, ग्लास गेम, बॉल बॅलन्स, सेंटर पॉईंट गेम, बॉक्स क्रिकेट, रोप गेम, बुक शोल्डर पासिंग, डक वॉक पासिंग यांसारखे खेळ घेतले जाणार आहेत. तसेच शाडूच्या मातीपासून वस्तू, फळे, गणपती व खेळणी बनवणे, चित्रकला, रंगकाम व ठसे काम अशा सर्जनशील उपक्रमांचाही समावेश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मेडिटेशन, प्रार्थना आणि झुम्बा डान्सने करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी डॉ. सुखदा पवार यांनी विद्यार्थ्यांना आनंदाने व उत्साहाने या कॅम्पमध्ये सहभागी होण्याचा संदेश दिला तसेच सर्वांना शुभेच्छा दिल्या. घोडागाडीत बसण्याचा आनंद घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद दिसून आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा रायपुरकर यांनी केले. समर कॅम्प यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले असून पुढील तीन दिवसांमध्येही विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.




