स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

रावेर (प्रतिनिधी) : स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयात दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी वार्षिक बक्षीस वितरण व विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. रविंद्र पवार सर होते. प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजू पवार सर, पर्यवेक्षिका कानुगो मॅडम तसेच नवनिर्वाचित नगरसेविका अनिता तायडे उपस्थित होत्या.
यावर्षी विशेष म्हणजे प्रथमच विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यासाठी वाहन चालक मंडळींना आमंत्रित करण्यात आले होते. मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वती पूजन व स्वामी पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विविध शालेय व शालाबाह्य स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. लोकमत ‘संस्काराचे मोती’, रंगोत्सव चित्रकला स्पर्धा, आदर्श परिपाठ स्पर्धा अशा विविध उपक्रमांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी वाहन चालकांनाही मंचावर आमंत्रित करून त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्यांच्या महत्त्वपूर्ण सेवेला मान्यता देत माध्यमिक विभागाने केलेल्या या उपक्रमाचे अध्यक्षांनी विशेष कौतुक केले. मुख्याध्यापकांनीही विद्यार्थ्यांसमोर चालकांच्या जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. बक्षीस मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका वर्षा अहिरे मॅडम व गायत्री सानसे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन रुपेश पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




