
जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोल्डसिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामाने आणि सुप्रीम इंडस्ट्रीजच्या सहकार्याने गोल्डसिटी हॉस्पिटल येथे आयोजित दोन दिवसीय शिबिरात ३९ विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी करण्यात आल्या.
शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, सुप्रीम इंडस्ट्रीजचे वरिष्ठ महाव्यवस्थापक ज्ञानदेव महाडिक, रोटरी इलाईटचे अध्यक्ष संदीप झंवर, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. वैजयंती पाध्ये, डॉ.गोविंद मंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुणे येथील डॉ. पंकज जिंदाल, डॉ. श्रेया गवारे आणि मुंबई येथील डॉ. शंकर सुब्रमण्यम यांनी १०१ रुग्णांची तपासणी आणि मार्गदर्शन करून ३९ शस्त्रक्रिया केल्या.
२००८ पासून सातत्याने या शिबिराचे आयोजन करण्यात येत असून शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटल मध्ये दाखल असलेल्या रुग्णांचा तीन दिवसांचा खर्च देखील आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे असे अध्यक्ष संदीप झंवर यांनी सांगितले. शिबिराचा समारोप सुप्रीम इंडस्ट्रीजचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट सुरेश मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यशस्वीतेसाठी रोटरी इलाईट क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांसह गोल्डसिटी हॉस्पिटलच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.




