जळगावताज्या बातम्यासमस्यासामाजिक

धामोडी–चिंचफाटा रस्त्यावरील सामाजिक कार्यकर्त्यांनी बुजवला भलामोठा “खड्डा”!

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा पुढाकार

धामोडी, ता. रावेर (प्रतिनिधी) : धामोडी–चिंचफाटा येथील ऐनपुर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून भलामोठा खड्डा पडलेला होता. या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर यांच्याकडे असतानाही, वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. परिणामी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.

या खड्ड्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी वाहनधारक, शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रात्रीच्या वेळी या खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. काही वेळा किरकोळ अपघातही घडल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

अखेर प्रशासनाच्या उदासीन भूमिकेला कंटाळून धामोडी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश महाजन, गजानन पाटील, सुरेश कोळी, अरुण पाटील यांच्यासह इ. ग्रामस्थांनी पुढाकार घेत स्वखर्चाने मुरूम खडी टाकून सदर भलामोठा खड्डा बुजवण्यात आला. या उपक्रमामुळे रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली असून संभाव्य अपघात टळले आहेत.

या सामाजिक कार्याचे ग्रामस्थांमधून कौतुक होत असले तरी, “हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने करणे अपेक्षित होते, नागरिकांनी नव्हे” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. तसेच प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याची कायमस्वरूपी डांबरी दुरुस्ती करावी, अन्यथा भविष्यात मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशाराही दिला आहे.

धामोडी–चिंचफाटा रस्ता हा खिर्डी, ऐनपुर, धामोडी, अजनदा मार्गे रावेर या गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा असून प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button