
विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी शाळेत विशेष मोहिम
जळगाव (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची गैरहजेरी कमी करणे आणि गळती रोखणे या उद्दिष्टाने “दररोज शाळेत जाऊ, शिक्षण घडवू” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठा प्रतिसाद देत आहेत.
गैरहजर विद्यार्थ्यांची त्वरित नोंद करून त्यांच्या पालकांशी संपर्क, घरभेटी, समुपदेशन, तसेच नियमित हजेरीसाठी प्रोत्साहनपर बक्षिसे अशी विविध उपक्रमांची मालिका राबविण्यात येणार आहे. शंभर टक्के हजेरी असलेल्या विद्यार्थ्यांना “हजेरी स्टार” सन्मान देऊन त्यांच्या उपस्थितीचे कौतुक केले जात आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी कथा, क्रीडा, कला, विज्ञान प्रयोग, आनंददायी वर्ग अशा उपक्रमांची जोडही देण्यात आली आहे. आर्थिक अडचण असलेल्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश यांसारखी मदत पुरवून ते शाळेबाहेर पडू नयेत याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. या मोहिमेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची गळती प्रभावीपणे कमी होणार असल्याचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले.




