
आरपीएल विजेत्यांचा सत्कार
जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्स आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव रॉयल्स यांच्या संयुक्त विद्यामाने सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. गणपती नगर मधील रोटरी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर रोटरी स्टार्सचे अध्यक्ष विपुल पटेल, सचिव हितेश सुराणा, रोटरी रॉयल्सचे अध्यक्ष जितू भोजवानी, सचिव गणेश वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
गुप्ता यांनी माहितीचा अधिकार कायदा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच जळगाव शहराच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर संवाद व चर्चा करण्यात आली. परिचय धनराज कासट यांनी तर सूत्रसंचालन व आभार सागर मुंदडा यांनी मानले. यावेळी दोन्ही क्लबच्या रोटरी प्रीमियर लीग स्पर्धेतील विजेते व उपविजेते संघांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास दोन्ही क्लबच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




