
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील सर्व दहा रोटरी क्लबच्या वतीने सोमवार ८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत विविध १६ ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डिस्ट्रिक्ट एन्क्लेव्ह कोऑर्डिनेटर महेंद्र रायसोनी यांनी दिली.
नाशिक ते नागपूर असे कार्यक्षेत्र असलेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० मधील ११६ रोटरी क्लबतर्फे मिशन लाईफ प्रोजेक्ट अंतर्गत एकाच दिवशी या रक्तदान शिबिरांचे आयोजन प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांच्या नेतृत्वात करण्यात येत आहे. शहरातील रोटरी क्लब जळगावतर्फे गव्हर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज, गांधी रिसर्च फाउंडेशन, टेकफ्लो इंजिनीयर प्रा. लि. सी-५/१, एमआयडीसी या तीन ठिकाणी तर रोटरी जळगाव मिडटाउनतर्फे मास टेक, जी- २३, एमआयडीसी जळगाव
व केसीईचे इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी शिबिर होणार आहे.
रोटरी जळगाव वेस्ट तर्फे एम.जे.कॉलेज आणि बाहेती कॉलेज येथे तर रोटरी जळगाव ईस्टतर्फे एमआयडीसी तील व्हिजन इंडस्ट्रीज बी- १२ येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी जळगाव सेंट्रल तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जिल्हा न्यायालय येथे व रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नूतन मराठा कॉलेजमध्ये शिबिर होणार आहे.
रोटरी जळगाव इलाईट तर्फे एमआयडीसीतील सुप्रीम इंडस्ट्रीज आणि सूनसगाव या ठिकाणी तर रोटरी जळगाव नॉर्थ तर्फे रेमंड इंडस्ट्रीज येथे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. रोटरी जळगाव रॉयल्स तर्फे आयएमआर कॉलेज येथे तर रोटरी जळगाव स्टार्सतर्फे एमआयडीसीतील अशोका इंडिया व फुले मार्केट या तीन ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रक्तदान करावे असे विद्यापीठा तर्फे आवाहन करण्यात आले असून त्या विद्यार्थ्यांना त्याबद्दल दोन अधिक गुण मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. सामाजिक बांधिलकी आणि या मानवतावादी कार्यात सर्व रोटरी सदस्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान करावे असे आवाहन रोटरी जळगाव परिवारातर्फे प्रेसिडेंट एन्क्लेव्ह चेअरमन जितेंद्र ढाके यांनी केले आहे.




