आरोग्यजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशासकीयशैक्षणिक

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम

जळगाव (प्रतिनिधी) : नवनिर्मित शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्ष बी.डी.एस. अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई चे सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मंचावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगावचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर व शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जगदीशचंद्र वठार, प्रशासकीय अधिकारी दिपक दांडगे, डॉ. गिरीष नाझीरकर, डॉ. सुधा मट्टीगट्टी, डॉ. पराग भोयर हे उपस्थित होते.

विध्यार्थ्यानी घेतली नैतिकतेची शपथ
सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे यांनी प्रथम वर्ष बी.डी.एस. विद्यार्थ्यांना दंत शिक्षणाचे महत्त्व, व्यावसायिक शिस्त, नैतिक मूल्ये तसेच रुग्णसेवेतील जबाबदाऱ्या पार पाडणेसाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कौशल्य, प्रामाणिकपणा व मानवतेची जपणूक करावी, असे त्यांनी नमूद केले. डॉ. विवेक पाखमोडे यांनी दंत अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना दंत व्यावसायिक शिक्षण व नैतिकतेची शपथ दिली तसेच रुग्ण व समाजाप्रती नैतिकता राखण्याचे आवाहन केले.

CBCT, OPG व औषधी विभागाचे उद्घाटन
शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जगदीशचंद्र वठार यांनी कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील उपलब्ध अत्याधुनिक यंत्रसामग्री, दंत रुग्णालयातील विविध विभाग, शैक्षणिक व भौतिक सुविधा तसेच भविष्यातील शैक्षणिक संधी यांची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. विवेक पाखमोडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयात नव्याने बसविण्यात आलेल्या सीबीसीटी (CBCT), ओपीजी (OPG) आणि औषधी विभागाचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. दिशिता चोखानी व डॉ. द्विक्कल तलरेजा यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. गिरीष नाझीरकर यांनी केले. यशस्वितेसाठी डॉ. संदिप पाटील, डॉ. भारत एस., डॉ. सुयोग जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button