
जळगाव (प्रतिनिधी) : पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व वाहतूक शाखांना कडक नाकाबंदी करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या ‘विशेष वाहन चेकिंग मोहिमे’ अंतर्गत ११०० हून अधिक वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली. दि.२४ डिसेंबर रोजी झालेल्या या कारवाईत १३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचपा बसवण्यासाठी आणि गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष वाहन चेकिंग मोहीम’ (Special Vehicle Checking Drive) राबविण्यात आली. त्याअनुषंगाने, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व वाहतूक शाखांनी आपली पथके तयार करून वाहनांची कसून तपासणी केली. या विशेष मोहिमेत प्रामुख्याने विना नंबर प्लेट वाहने (Without Number Plate) आणि अल्पवयीन वाहन चालक (Underage Drivers) यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी प्रामुख्याने विना नंबर प्लेट फिरणारी आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या ४६३ वाहनांवर कारवाई करून ४ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात १०७ अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळली. त्यांच्या पालकांकडून पोलिसांनी ४ लाख ४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला असून, “आपल्या पाल्यांच्या हाती वाहने देऊन त्यांचे आयुष्य धोक्यात घालू नका,” असे भावनिक आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव यांसह जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कडक नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये विना हेल्मेट, विना परवाना आणि इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५३६ केसेस दाखल करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी आणि वाहतूक शाखांनी ही यशस्वी कामगिरी केली. आगामी काळातही अशाच प्रकारची मोहीम सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस दलाने दिले आहेत.




