विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांच्या विक्रीवर FDAची धडक कारवाई; ₹१.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात विनापरवाना सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती व विक्री होत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने जळगाव शहर आणि अमळनेर येथे धडक कारवाई केली. या कारवाईत दोन्ही ठिकाणांहून एकूण ₹१ लाख ६ हजार ३२५ किमतीचा सौंदर्यप्रसाधनांचा साठा व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने २३ ऑगस्ट रोजी अमळनेर येथील रविंद्रनगर परिसरात, तर २४ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील महाबळ परिसरात तपासणी केली. अमळनेर येथे ₹७२,३९२, तर जळगावात ₹३३,९३३ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासणीदरम्यान विविध प्रकारच्या क्रीम, पावडर आणि जेल स्वरूपातील सौंदर्यप्रसाधनांसह प्रिंटेड लेबल, रिकाम्या बरण्या, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि पॅकिंग साहित्य आढळून आले. संबंधित उत्पादनांसाठी आवश्यक वैध परवाना नसल्याचे तपासणीत समोर आले.
काही उत्पादनांवर आवश्यक माहिती नसलेली लेबले असल्याचेही प्रशासनाच्या तपासणीत आढळले. तसेच उत्पादनांची गुणवत्ता तपासणी न करता त्यांची विक्री केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या सौंदर्यप्रसाधनांपैकी काही नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
दरम्यान, नागरिकांनी सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना उत्पादकाचे नाव-पत्ता, परवाना क्रमांक, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख आणि मुदतबाह्यता तारीख यांची खात्री करावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
बनावट किंवा निकृष्ट दर्जाची सौंदर्यप्रसाधने थेट त्वचा आणि आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे आकर्षक पॅकिंग किंवा कमी किंमत पाहून खरेदी करण्याऐवजी उत्पादनाची अधिकृत माहिती तपासणे आवश्यक आहे.




