
विदित गुजराती, दिव्या देशमुख यांना अर्जुन पुरस्कार; नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार
मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ मध्ये महाराष्ट्राने उल्लेखनीय यश मिळवले आहे. बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराती आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तसेच नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पुणे येथील आर्मी पॅरालिम्पिक नोड यांना राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींनुसार विविध क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थेच्या योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
बुद्धिबळ क्षेत्रात महाराष्ट्राचा गौरव
उत्कृष्ट क्रीडा कामगिरीसाठी दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कार २०२५ साठी महाराष्ट्रातील दोन बुद्धिबळपटूंची निवड झाली आहे. ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराती आणि ग्रँडमास्टर दिव्या जितेंद्र देशमुख यांनी बुद्धिबळ क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नेहा चव्हाण यांना द्रोणाचार्य पुरस्कार
उत्कृष्ट प्रशिक्षकांना दिला जाणारा द्रोणाचार्य पुरस्कार २०२५ नेमबाजी प्रशिक्षक नेहा नंदकुमार चव्हाण यांना नियमित श्रेणीत जाहीर झाला आहे. खेळाडूंना सातत्यपूर्ण प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देत त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरीसाठी तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे यांचा राष्ट्रीय सन्मान
क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार २०२५ साठी आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे यांची निवड झाली आहे. पॅरालिम्पिक खेळाडूंना प्रशिक्षण, आवश्यक सुविधा आणि प्रोत्साहन उपलब्ध करून देत त्यांच्या क्रीडा कारकिर्दीला चालना देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संस्थेकडून केले जाते.
देशातील इतर पुरस्कारार्थी
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ अंतर्गत विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील खेळाडू आणि प्रशिक्षकांचाही गौरव करण्यात आला आहे.
अर्जुन पुरस्कार
- तेजस्विन शंकर — ॲथलेटिक्स
- मुहम्मद अजमल व्ही. — ॲथलेटिक्स
- प्रियंका गोस्वामी — ॲथलेटिक्स
- त्रिशा जॉली — बॅडमिंटन
- गायत्री गोपीचंद — बॅडमिंटन
- नरेंद्र — बॉक्सिंग
- धनुष श्रीकांत — कर्णबधिरांसाठी नेमबाजी
- लालरेमसियामी — हॉकी
- राजकुमार पाल — हॉकी
- सुरजीत — कबड्डी
- पूजा — कबड्डी
- रुद्रांश खंडेलवाल — पॅरा-नेमबाजी
- एकता भायन — पॅरा-ॲथलेटिक्स
- अरविंद सिंह — नौकानयन
- अखिल श्योरान — नेमबाजी
अर्जुन पुरस्कार — जीवनगौरव
- आय. अरुमइनायागम — फुटबॉल
द्रोणाचार्य पुरस्कार — नियमित श्रेणी
- परवीर सिंह — ॲथलेटिक्स
- छोटे लाल यादव — बॉक्सिंग
द्रोणाचार्य पुरस्कार — जीवनगौरव श्रेणी
- धर्मेंद्र सिंह यादव — बॉक्सिंग
- वीरेंदर कुमार — कुस्ती




