ताज्या बातम्याराष्ट्रीय-राज्यसामाजिक

‘विकसित भारत यूथ कॉन्क्लेव्ह-२०२६’ ठरणार देशभरातील युवकांना जोडणारा मंच

क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि संस्कृतीच्या माध्यमातून युवकांना संधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यात ‘विकसित भारत यूथ कॉन्क्लेव्ह-२०२६’ या तीन दिवसीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. देशातील विविध भागांतील युवकांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या कामकाजाबाबत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

सुमारे एक हजार युवकांचा सहभाग

पुण्यातील बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील युवा संमेलनात देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील युवक सहभागी होणार आहेत. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशातून सुमारे ३० ते ३५ प्रतिनिधी सहभागी होणार असून, एकूण सुमारे १ हजार प्रतिनिधी उपस्थित राहतील.

यामध्ये महाराष्ट्रातील ३०० प्रतिनिधी, तर इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतून ७०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. तीन दिवसांच्या या महोत्सवाला राज्यभरातील एक लाखांहून अधिक युवकांचा फूटफॉल राहील, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

‘वॉरियर, फ्युचर आणि कल्चरल’ असे तीन झोन

‘विकसित भारत यूथ कॉन्क्लेव्ह-२०२६’मध्ये युवकांना विविध क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी ‘वॉरियर, फ्युचर आणि कल्चरल’ अशा तीन प्रमुख क्षेत्रांची संकल्पना मांडण्यात आली आहे.

वॉरियर झोनमध्ये युवकांमध्ये शिस्त, धैर्य आणि आत्मविश्वास वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान, पोषण, क्रीडा मानसशास्त्र यासह ऑब्स्टॅकल कोर्स, वॉल क्लायम्बिंग, रिअॅक्शन टाइम अरेना आणि फिटनेस यांसारखे अनुभवाधारित उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

फ्युचर झोनमध्ये पुण्याची तंत्रज्ञान व नवोन्मेष क्षेत्रातील ओळख लक्षात घेऊन युवकांच्या तांत्रिक कौशल्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. नव्या तंत्रज्ञानासोबतच नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देणारे उपक्रम येथे असतील.

कल्चरल झोनमध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा परिचय युवकांना करून देण्यात येणार आहे. लोककला, लोकसंगीत, लोकनृत्य, चित्रकला आणि छायाचित्रण यांसाठी स्पर्धा व विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.

यासोबतच योग, ध्यान, मानसिक आरोग्य, श्वसनाचे व्यायाम, वारली व पैठणी कला, स्थानिक हस्तकला, पारंपरिक महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृती आणि शाश्वत जीवनशैली यांचीही माहिती युवकांना दिली जाणार आहे.

संपूर्ण प्रक्रिया डिजिटल

महोत्सवातील सहभागाची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या. ऑनलाइन नोंदणी, राज्यनिहाय नामनिर्देशन, कागदपत्र पडताळणी, क्यूआर कोड आधारित डिजिटल ओळखपत्र, मोबाईल कार्यक्रम मार्गदर्शक आणि थेट सूचना अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

यामुळे युवकांची नोंदणी, प्रवेश आणि विविध कार्यक्रमांमधील सहभागाचे व्यवस्थापन अधिक सुलभ आणि प्रभावी होणार आहे.

क्रीडा क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला चालना

महाराष्ट्राला आगामी दशकात क्रीडा क्षेत्रात देशातील आघाडीचे राज्य बनविण्यासाठी शासकीय प्रयत्नांसोबतच खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

‘खेलो इंडिया’अंतर्गत केंद्राकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार असल्याने त्याचा प्रभावी वापर करण्यासोबतच सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील क्रीडा फाउंडेशनच्या सहकार्याने क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

युवकांची ऊर्जा, कौशल्य, नवोन्मेष आणि सांस्कृतिक वैविध्य यांना एकत्र आणत ‘विकसित भारत’ाच्या संकल्पनेला बळ देणारा हा युवा महोत्सव ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button