
रावेर (प्रतिनिधी) : आभोडा येथे गोमांसाची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शुक्रवारी सकाळी कारवाई केली. पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सुमारे ६०० किलो गोमांस जप्त केले. यासोबतच जनावरांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन कुऱ्हाडी आणि दोन सुरे पोलिसांनी ताब्यात घेतले.
कत्तलीसाठी आठवडे बाजार परिसरात बांधून ठेवलेल्या तीन गोवंशांची देखील पोलिसांनी सुटका केली. रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारे गोवंशाची कत्तल होत असल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुप्त माहितीच्या आधारे छापा
आभोडा गावातील बसस्थानक परिसरातील एका घरात जनावरांची कत्तल करून गोमांसाची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान उस्मान हसन कुरेशी (४८, रा. आभोडा) यांच्या ताब्यातील घरात जनावरांची कत्तल करून गोमांस कापण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावरून अंदाजे ३०० किलो गोमांस, एक कुऱ्हाड आणि एक सुरा जप्त केला.



