ताज्या बातम्याराष्ट्रीय-राज्य

हर घर तिरंगा’ अभियान ९ ते १७ 

ऑगस्टदरम्यान ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन


जळगाव (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने ‘हर घर तिरंगा अभियान-२०२६’ देशभरात ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यंदाचे अभियान ‘वंदे मातरम्-१५० वर्षे’ या संकल्पनेला समर्पित करण्यात आले असून, अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन, राष्ट्रीय ध्वजाबाबत जनजागृती आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय ध्वजाबद्दल नागरिकांमध्ये आदर, अभिमान व राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करणे, ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेणे, तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे, ही अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. विद्यार्थी, युवक, स्वयंसेवी संस्था, उद्योग, शासकीय विभाग आणि सर्वसामान्य नागरिकांनी या अभियानात व्यापक सहभाग नोंदवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.

तिरंगा रॅलीचे आयोजन

अभियानांतर्गत जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर बाइक, सायकल व ई-बाइक तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. युवक मंडळे, विद्यार्थी, शासकीय अधिकारी, पोलीस, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचा रॅलीत सहभाग राहणार आहे. रॅलीचे मार्ग स्वातंत्र्यसैनिक स्मारके व प्रमुख सार्वजनिक स्थळांमधून नियोजित करण्यावर भर देण्यात येणार आहे. वाहतूक आणि सुरक्षिततेसाठी पोलीस विभागाशी समन्वय साधण्यात येणार असून, रॅलीची सुरुवात ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने करण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रम

नागरिकांनी HarGharTiranga.com या संकेतस्थळावर ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यंदा सेल्फीसोबत ‘वंदे मातरम्’ गीताचा व्हिडिओही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी नागरिकांना तिरंग्यासोबत सेल्फी काढून तो डिजिटल माध्यमांवर अपलोड करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.

तिरंगी रोषणाईने उजळणार सार्वजनिक ठिकाणे

अभियानाच्या निमित्ताने शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, पूल, धरणे, प्रमुख रस्ते, रेल्वे स्थानके, बसस्थानके, विमानतळ, चौक तसेच सार्वजनिक इमारतींवर तिरंगी रोषणाई व आकर्षक सजावट करण्याचे नियोजन आहे. शहरांबरोबरच गावांमध्येही देशभक्तीपर वातावरण निर्मितीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

‘वंदे मातरम्’ विषयावर तिरंगी रांगोळी

‘वंदे मातरम्’ या विषयावर मोठ्या आकाराच्या तिरंगी रांगोळ्या काढण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेऊन प्रमुख सार्वजनिक ठिकाणी रांगोळी स्पर्धांचे आयोजनही करता येणार आहे. सामाजिक माध्यमे व स्थानिक माध्यमांच्या माध्यमातून या उपक्रमांचा व्यापक प्रसार करून नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढविण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे  करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button