व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी आज विशेष व्याख्यान; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

रावेर | प्रतिनिधी:
समाजात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आज (दि. ७ ऑगस्ट) सारोळखेडे येथे विशेष व्यसनमुक्ती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात व्यसनांचे दुष्परिणाम, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते डॉ. मितीन विषपुते उपस्थितांना मार्गदर्शन करणार असून, युवकांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक, मानसिक आणि आरोग्यविषयक समस्यांवर ते प्रकाश टाकणार आहेत. तसेच व्यसनापासून दूर राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि कुटुंबाची भूमिका याबाबतही माहिती देण्यात येणार आहे.
या व्याख्यानात विद्यार्थी, युवक, पालक, महिला तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने व्यसनमुक्तीचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचविल्यास निरोगी आणि सुदृढ समाज निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.




