जळगावताज्या बातम्या

लेखी आश्वासनानंतरही खिर्डीतील बेमुदत उपोषण कायम

रावेर (प्रतिनिधी): खिर्डी बुद्रुक येथील बसस्थानक ते जिल्हा परिषद मराठी शाळेदरम्यानच्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण लेखी आश्वासन मिळूनही अद्याप सुरूच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामपंचायत सदस्य गणेश महादेव देवकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणात दररोज सकाळी ८ वाजल्यापासून नागरिक सहभागी होत आहेत. ग्रामस्थांनी रस्त्याची तातडीने दुरुस्ती, रस्त्यालगतच्या साईडपट्ट्यांची मजबुतीकरणाची कामे, तसेच आवश्यक ठिकाणी गटारी, डांबरीकरण अथवा सिमेंट काँक्रीट रस्ता उभारण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी २६ जून आणि ३ जुलै रोजी संबंधित प्रशासनाला लेखी निवेदने देण्यात आली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन देण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

उपोषणकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करून नागरिकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button