
राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन; जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी
जळगाव (प्रतिनिधी): कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित इंडियास्किल्स स्पर्धा २०२६-२७ साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विविध कौशल्य क्षेत्रांत प्राविण्य असलेल्या जिल्ह्यातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.
इंडियास्किल्स ही देशातील सर्वोत्तम कौशल्याधारित स्पर्धकांची निवड करणारी प्रतिष्ठित स्पर्धा असून, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरणाऱ्या स्पर्धकांना वर्ल्डस्किल्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते.
६३ कौशल्य क्षेत्रांमध्ये सहभागाची संधी
या स्पर्धेत इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डिंग, वेब टेक्नॉलॉजी, मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट, क्लाऊड कॉम्प्युटिंग, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, कारपेंट्री, ग्राफिक डिझाईन, फॅशन टेक्नॉलॉजी, रिन्यूएबल एनर्जी, प्लंबिंग, इंडस्ट्रियल मेकॅनिक्स यांसह एकूण ६३ कौशल्य क्षेत्रांमध्ये सहभागाची संधी उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी प्रथम स्किल इंडिया डिजिटल हब (SIDH) पोर्टलवर नोंदणी करावी. त्यानंतर मोबाईल क्रमांकाद्वारे लॉगिन करून आधार-आधारित ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करावी आणि इंडियास्किल्स स्पर्धा २०२६-२७ या पर्यायातून ऑनलाइन अर्ज सादर करावा.
पात्रता निकष
स्पर्धेसाठी शैक्षणिक पात्रतेची कोणतीही अट नाही.
- क्लाऊड कॉम्प्युटिंग, एअरक्राफ्ट मेंटेनन्स, आयसीटी नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर आणि वॉटर टेक्नॉलॉजी या कौशल्य क्षेत्रांसाठी अर्जदारांचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.
- उर्वरित सर्व कौशल्य क्षेत्रांसाठी अर्जदारांचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतरचा असावा.
जिल्हा ते जागतिक स्तरापर्यंत संधी
स्पर्धेचे आयोजन जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तरावर यशस्वी ठरणाऱ्या स्पर्धकांना वर्ल्डस्किल्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.
आयटीआय, अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
जिल्ह्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), अभियांत्रिकी महाविद्यालये, पॉलिटेक्निक महाविद्यालये, कौशल्य प्रशिक्षण संस्था तसेच पात्र युवक-युवतींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जिल्ह्याचे राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नोंदणी व संपर्क
इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर ऑनलाइन नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच दूरध्वनी : ०२५७-२९५९७९० वरही आवश्यक माहिती उपलब्ध होईल.
जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागी होऊन आपल्या कौशल्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करण्याची संधी साधावी, असे आवाहन सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.




